महामहिम पत्रकार गोविंदराव तळवलकर यांनी प्याकेज पत्रकारितेच्या सीबीआय चौकशीची मागणी केल्याचे वृत्त प्रहारपत्री वाचल्यानंतर आम्हांस अन्न गोड लागेनासे झाले आहे. आमच्या हृदयाचे ठोके जलद पडत आहेत. सारखी स्वच्छतागृहास जाण्याची भावना होत आहे. (या भावनेचा आणि सकाळच्या स्वच्छतामोहिमेचा काडीमात्र संबंध नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच सकाळची स्वच्छतामोहिम ही पत्रकारिता वा पत्रकार यासंबंधीची नाही, याचीही वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)
स्पष्टच सांगावयाचे, तर आम्ही प्रचंड भ्यालो आहोत!
सध्या एकूणच वातावरण भयाच्या फ्ल्यूने भारलेले आहे.
आधीच नोकरी जाण्याचे भय.
ती टिकली, तर वेतनकपातीचे भय.
वेतनकपात नच झाल्यास, कामाचा बोजा वाढण्याचे भय.
त्यात आता गोविंदरावांनी ही नवी भोकाडी आम्हां पामरांसमोर आणून ठेवली!
तुम्हांस सांगतो, हल्ली बातमी लिहिताना सीबीआय, धाड, सक्तमजुरी, घोटाळा, काळा पैसा असे शब्द आले, तरी आम्हांस दचकायला होते.
वाटते, उद्या आमच्याबद्दल तर अशी बातमी येणार नाही ना!
मन फार वढाय वढाय असते हो!
शुभ बोल म्हटले, तर मांडवाला आग लागली म्हणते!
आमची ही अशी सैरभैर अवस्था आमच्या हिच्यापासून लपली नाही.
कशी लपणार?
सकाळी कचेरीत जाताना आम्ही रामरक्षा म्हणत होतो, हे तिने बरोबर हेरले होते.
बुशशर्टाच्या डाव्या खिशात आम्ही हल्ली स्वामी समर्थांचे छायाचित्र ठेवतो, हेही तिच्या ध्यानी आले होते.
एरवी आम्ही निखळ पुरोगामी. त्यामुळे तिच्या बरोबर लक्षात आले, की ह्यांचे काही तरी बिघडले आहे.
तिने लगेच विचारले, पोट बिघडलेय काय हो?
तिच्या स्वरातील ती काळजी व चिंता पाहून आम्हांस गहिवरूनच आले.
डोळ्यांच्या कडा पुसत आम्ही म्हटले, गोविंदरावांनी सीबीआय चौकशीची मागणी केलीय.
तिने लगेच विचारले, कोण हे गोविंदराव? त्यांचे पत्रकारितेत काय योगदान आहे?
आमची ही रा. रा. मिखिल वागळेंची फॅन आहे. पूर्वी महानगर वाचायची.
तिला म्हटले, ते ज्येष्ठ संपादक व विचारवंत आहेत.
ती म्हणाली, मग काही हरकत नाही. तुम्ही काही घाबरू नका.
म्हटले, का बरे? संपादकाचा दरारा असण्याचे दिवस कधीच संपलेत! पण अगदीच घाबरू नका म्हणजे काय?
ती म्हणाली, संपादक आहेत ना ते. मग असे किती दिवस राहतील तुमच्या पेपरात? सकाळचं पाहताय ना?
लक्षात आले, की तिचा भलामोठा गैरसमज झालेला आहे. तो आम्ही दूर केला.
म्हटले, सखये, ते आता कोणत्याही पत्राचे संपादक नाहीत. ते निवृत्त असून, दूर सातासमुद्रापार असतात व अमेरिकेवर लिहितात. त्यांनी पॅकेज पत्रकारितेच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
हे ऐकल्यावर मात्र तीही विचारात पडली.
मग म्हणाली, तुम्हीपण ना बावळटच आहात!
त्यावर आम्ही तिला बाणेदारपणे प्रत्युत्तर देणार होतो. केवळ पद व खुर्ची असल्याने वरिष्ठ अशी विशेषणे आम्हांस लावतात व त्यांच्याकडे केवळ पद व खुर्ची असल्याने आम्ही ती ऐकूनही घेतो. परंतु हे बायको, आम्ही तुझ्याकडून असे अपशब्द ऐकून घेणार नाही. ही काही संपादकीय बैठक वा कॉन्फरन्स नाही, असे आम्ही म्हणणार होतो. परंतु उपसंपादकीय बाण्यानुसार ऐनवेळी आमची शेपटी पायांमध्ये गेली.
ती बोलतच होती, तुम्हांला ना साधी गोष्टसुद्धा समजत नाही. त्यांनी पॅकेज पत्रकारितेच्या चौकशीची मागणी केलीय ना? पाकिट पत्रकारितेच्या नाही ना? मग तुम्ही का घाबरताय? तुम्ही तर साधे पाकिटवाले. दोन पेगात बातमी देणारे. आणि मला सांगा, पॅकेज कोण घेत होतं?
म्हटले, म्यानेजमेन्ट!
ती म्हणाली, मेन्टलासारखे बोलू नका हो! म्यानेजमेन्ट म्हणजे कोण असतं शेवटी? मालकच ना! तेव्हा घाबरायचे असेल, तर मालकांनी घाबरावे!
ते धीराचे बोल ऐकून आमच्या प्राणात प्राण आले.
पण मग एक शंका आली, मालक कशाला घाबरतील? त्यांनी ज्यांची पॅकेजे घेतली, त्यातील काही तर सत्ताधारी. सीबीआय चौकशी लावायची म्हटले, तरी लावणार कोण?... आणि आपण आपले उगाचच घाबरतो.
पण मग आणखी एक शंका मनात आली, की
मालकाने पॅकेज घेतले, तरी त्या बातम्या लिहिल्या त्या आपणच की. त्या पुरवण्या लावल्या त्या आपणच की. शेवटी आपला पगार होतो तो त्यातून निर्माण झालेल्या काळ्या पैशातूनच. तेव्हा त्या पापात तर आपणही सामील आहोत. आपण वाल्या कोळ्याच्या सौभाग्यवती व सुपुत्रांसारखे वागून कसे चालेल?
पण मग आणखी एक शंका मनात आली, की
मग गृहकर्जाचे हप्ते कसे फेडायचे?
मग मुलाचे शिक्षण कसे करायचे?
मग पत्नीस मल्टिप्लेक्सी कसे न्यायचे?
त्याकरीता नोकरी हवी.
पगाराचे चांगले प्याकेज हवे.
पत्रकारू म्हणतात हे प्याकेज हवे,
तेव्हा मालक म्हणतात, मग ते प्याकेज हवे!
भलीमोठी गोचीच की ही!
गोविंदराव, आमच्या या गोचीची चौकशी कोण करणार हो?
(Posted by बापू आत्रंगे, ३० ऑक्टो. २००९)
पत्रकार हसताहेत.
खोखो हसताहेत, खिखीखिखी हसताहेत, ढसाढसा हसताहेत.
काही गालातल्या गालात, ओठ दुमडून,
तोंडावर रुमाल धरून हसताहेत.
पण पत्रकार हसताहेत.
बोरिबंदरच्या फलाटावर गाडी पकडताना हसताहेत
सानपाड्याला हायवेवर बस धरताना हसताहेत
बेलापूरला कुंपणावरून उड्या मारताना हसताहेत
पत्रकार हसताहेत.
वेजबोर्डावरचे हसताहेत, कंत्राटावरचे हसताहेत,
पाचशेच्या व्हाऊचरवरचेसुद्धा दात कोरून हसताहेत.
उपसंपादक पानांच्या शिरा काढताना हसताहेत,
बातमीदार बातम्यांच्या पाट्या टाकताना हसताहेत,
काही पत्रकार तर कसले कसले सर्व्हेचे फॉर्म भरतानाही हसताहेत.
पत्रकार हसताहेत.
मालक चिंताग्रस्त झालेत.
शाखाशाखांच्या व्यवस्थापकांना फोन करताहेत,
काढून टाकायच्या लोकांची यादी करणे तूर्तास थांबवा व जाऊन पाहा,
पत्रकार हसताहेत.
संपादक काळजीने बैठका घेताहेत.
एक जाणते संपादक,
परिस्थिती गंभीर असून यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे,
असे म्हणताहेत.
दुसरे विचारवंत संपादक खुर्चीचा हात घट्ट धरून,
ही लोकशाहीची गंभीर थट्टा असून, कामे कमी असल्यानेच पत्रकार हसत आहेत.
म्हणून त्यांच्या तीन फुल्यांमध्ये बांबू घातला पाहिजे,
असा लोकशाहीवादी विचार आपल्या डायरीत लिहित आहेत.
नेत्यांचे पीए त्यांच्या कानात सांगताहेत,
कार्यकर्ते आपापसात उगाचच कुजबुजताहेत,
फावले लोक फावल्या वेळात बातम्या चघळताहेत,
की पत्रकार हसताहेत.
वृत्तवाहिन्यांवर विश्लेषणे सुरु झालीत.
अँकर कोकलताहेत,
सूत्रसंचालक तीस सेकंदात बोला असे तज्ञांना सांगताहेत,
एकच क्लिप पुनःपुन्हा दाखवताहेत,
की पत्रकार हसताहेत.
कुणी म्हणतेय, दिवाळीच्या गिफ्टा मिळाल्याने पत्रकार हसताहेत.
कुणी म्हणतेय, बोनस मिळाल्याने हसताहेत.
कुणी म्हणतेय, अद्याप नोकरी टिकल्याने हसताहेत.
कुणी म्हणतेय, पॅकेज पत्रकारिता पाहून हसताहेत.
कुणी म्हणतेय, पॅकेज पत्रकारितेवरील टीका वाचून हसताहेत.
नेमके निदान कोणालाच करता येत नाहीये,
पण अफवा अशीही आहे, की
स्वतःचाच चेहरा पाहून पत्रकार हसताहेत.
काहीही असो,
पत्रकार स्वतःला हसताहेत
म्हटल्यावर
सगळे आरसे फोडलेच पाहिजेत...
स्वतःशी प्रामाणिक राहणे, म्हणजे भलतेच की विनोदी!
(Posted by बापू आत्रंगे, दि. २२ ऑक्टो. २००९)
वाचा -
तीन कोटींचा तमाशा : अग्रलेख, लोकसत्ता (२१ ऑक्टो.)
त्यांनी सूर्यदेखील बाजारात आणला..! - अजित अभ्यंकर , संजय दाभाडे, लोकसत्ता, २१ ऑक्टो.
चौथा स्तंभ विकला गेला आहे - अंकुश काकडे, लोकसत्ता, २१ ऑक्टो.
दादा, हे संपादक.
कार्यकर्ता म्हणाला. दादा दूरध्वनीवर बोलत होते. त्यांनी संपादकांना हातानेच समोरच्या खुर्चीवर बसण्याची खूण केली. संपादक बसले. दादांचा दूरध्वनी सुरुच होता. टेबलवर पडलेले प्रचाराचे पत्रक हाती घेऊन संपादक ते चाळू लागले.
जरा वेळाने दूरध्वनी खाली ठेवत दादांनी संपादकांना नमस्कार केला.
संपादकांनीही केला.
मग दादा म्हणाले, बोला.
संपादक म्हणाले, विशेष काही नाही. तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात. म्हटलं, जाऊन भेटू या.
दादा म्हणाले, तुम्ही आलात ते चांगलं केलं... पण आपली मदत पाहिजे बरं का या वेळेला.
संपादक म्हणाले, ती तर आहेच.
मग संपादक राजकीय सद्यस्थितीवर बरेच बोलले.
ढासळती नीतीमूल्ये, समाजहितैषू वृत्तीचा लोप, सौदेबाज राजकारणी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, प्रसारमाध्यमांची ढासळती विश्वासार्हता यावरही ते बरेच बोलले.
मग म्हणाले, तुमच्या बातम्या-फोटो व्यवस्थित छापतोय आम्ही.
दादांनी आपल्या कार्यकर्त्याकडे पाहिले. तो म्हणाला, चांगलं कव्हरेज देतात हे आपल्याला.
दादा प्रसन्नसे हसले.
मग त्यांनी विचारले, कोणता पेपर म्हणालात तुमचा?
कार्यकर्ता म्हणाला, दादा, मोठा पेपर आहे त्यांचा. भरपूर खपतो.
दादा म्हणाले, खप चांगला आहे म्हणता तुमचा. पण त्यातला खरा किती आणि स्किमचा किती?
संपादक म्हणाले, राज्यातला नंबर एकचा विश्वासार्ह आणि निःपक्षपाती पेपर आहे आमचा.
निःपक्षपाती असेल, तर मग आमच्या काय हो उपयोगाचा?
दादांनी ज्योक केला. संपादक कसनुसे हसले. ते पाहून दादाही समजून हसले.
संपादक म्हणाले, या निवडणुकीत आम्ही एक स्कीम आखलीय. आम्ही तुमच्या बातम्या, लेख, फोटो हे सगळं छापणार.
दादा म्हणाले, वा वा. छापा की. काय पाहिजे ते मटेरियल आम्ही देऊ.
संपादक म्हणाले, नाही. मटेरियलचा प्रश्न नाही. त्यासाठी आमचे बातमीदार आहेतच.
दादा म्हणाले, तुमचा कोण तो बातमीदार. परवाच भेटून गेला. म्हटला, मुलाखत छापतो. दोन हजार अंक घ्यावे लागतील.
संपादक म्हणाले, तेच सांगतोय मी. आम्ही एक स्कीम आखलीय. म्हणजे तुमची नुसती मुलाखत नाही छापायची. तुमच्याबद्दलचे लेख छापायचे. फोटो छापायचे. तुमचा गुणगौरव करणा-या कविता, मान्यवरांच्या मुलाखती.. अशी एक पुरवणीच काढायची.
दादा म्हणाले, पण त्याचा काय उपयोग. ह्ल्ली लोक खूप हुशार झालेत. त्यांना बरोबर माहित असतं, की हे सगळं पैसे देऊन छापलेलं असतं.
संपादक म्हणाले, तेच तर सांगतोय मी. आमचा पेपर हा अत्यंत विश्वासार्ह आणि निःपक्षपाती असल्यामुळे लोकांना ती शंकाच येणार नाही. त्यांना वाटेल, आम्हीच स्वतःहून छापलंय ते.
दादा म्हणाले, पण याचा रेट काय?
संपादकांना रेट म्हणताच लाजल्यासारखे वाटले. पण ते लाजले नाहीत.
ते म्हणाले, आता तुमच्याशी काय बोलायचं साहेब. तुम्हीच द्या समजून झालं.
दादा म्हणाले, नाही नाही. तसं नको. तुम्ही भाव सांगा.
संपादक म्हणाले, आता तुमच्याशी काय भाव करायचा साहेब. पण शेवटी आम्हांलाही मालक आहे. एवढी मोठी संस्था आमची. एवढं जुनं साम्राज्य. त्यात आता पसाराही वाढवून ठेवलाय. हे सर्व चालवायचं म्हणजे पैसे पाहिजेतच ना.... पाच लाखांची पुरवणी छापू तुमची.
दादा म्हणाले, पाच म्हणजे खूपच जास्त होतात. तुमचा तो दुसरा पेपर... काय नाव त्याचं.... तो लाखभरात चार पानं छापतो म्हणाला.
संपादक एकदम सावध झाले.
ते म्हणाले, हॅ. तो काय पेपर आहे? तो काय विश्वासार्ह आहे का निःपक्ष?... चला, चारमध्ये करून टाकू या.
दादांनी कार्यकर्त्याकडे पाहिले. कार्यकर्त्याने संपादकांकडे पाहिले. संपादकांनी दादांकडे पाहिले.
मग बराच काळ त्यांची घासाघीस सुरु राहिली.
सौदा कितीवर झाला ते काही समजले नाही.
समजले एवढेच,
की येत्या एक-दोन दिवसांत दादांची स्पेशल सप्लिमेन्ट विश्वासार्ह व निःपक्ष पेपरबरोबर येणार आहे.
(Posted by चांगदेव पाटील, २६ सप्टें. २००९)

वाचकांतील सभ्य स्त्री, पुरुष व अन्य यांस सविनय निवेदन -
गत काही महिने आम्ही एका वेगळ्या उद्योगात मग्न होतो. खरे तर उद्योग हाच, लेखनाचा होता, परंतु वेगळ्या माध्यमासाठी आम्ही लिहित होतो व ते माध्यम म्हणजे दूरचित्रवाणी हे होय.
होय, दूरचित्रवाणीवरील मी मराठी या वाहिनीवरील एका मालिकेसाठी आम्ही लेखन करीत होतो.
त्या मालिकेचे नाव, नावात काय आहे? असे असून, ती मालिका दर शुक्रवारी रात्री साडे नवाच्या ठोक्यास प्रक्षेपित होणार आहे. उद्या, शुक्रवार दिनांक चार सप्टेंबर रोजी त्या मालिकेचा पहिला भाग दाखविणार आहेत.
तरी आपण सहपरिवार, इष्ट मित्रमैत्रिणींसह ही मालिका पाहून तिच्यावर टीका आणि टिपण्णी करण्याची कृपा करावी, ही विनंती.
मालिकेचे लेखन संपले, की मग बातमीदारवर तुम्ही आहात आणि आम्ही आहोतच.
अनेक दिवसांची कसर भरून काढायची आहे. अनेक विषय मस्तकी आहेत.
त्यांचा सविस्तर समाचार घेऊच.
मध्यंतरी आमच्या कानी अशी चर्चा येत होती, की
बापूंना एका वृत्तपत्राच्या म्यानेजमेन्टने दम भरल्याने बापू भयग्रस्त झाले व म्हणून त्यांनी ब्लॉगलेखन थांबविले. तर तसे काही नाही. कारण -
१. आम्ही ज्या प्रकारचे लिखाण करतो, त्यास मराठीमध्ये मोठी परंपरा असून, त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता आमच्या अंगी यावी असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.
२. आम्ही बातमीदारवर जे लिहितो ते कोणाच्याही विरोधात नसते, तसेच येथे कोणाचीही बदनामी करावी असा उद्देश नसतो व हे समजून घेण्याची शक्ती पत्रकार व पत्रमालक व पत्रव्यवस्थापक आदीकरोनी सर्वांस असावी, असा आमचा अजून तरी समज आहे.
असो.
आमच्या या निवेदनाने सर्व अफवा, वावड्या, बोलवा व चर्चांस पूर्णविराम मिळेल, अशी आमची खात्री आहे.
आपण बातमीदारवर जे प्रेम करीत आहात, ते असेच कायम राहो, हीच कामना.
(हे फार इमोशनल होतंय का? होऊ दे.)
- आपला नम्र,
बापू
(दि. ३ सप्टेंबर २००९)
आजचा मुंबै सकाळ व चित्रमय टुडे वाचलात का?
हो. सकाळीच.
आणि त्यातील टुडेच्या वर्धापनदिनाची बातमी?
ती 'सकाळ'मध्ये हशा-टाळ्यांचा झिम्मडझिम्मा या शीर्षकाची बातमी ना? वाचली की.
मग काय वाटले?
काय वाटणार? सकाळमधील एक पुरवणी तब्बल तीन वर्षे सुरु राहिली, याबद्दल आनंदच वाटला! शिवाय बातमीचा मथळाही आवडला आम्हांला. मराठी पेपरांची ही परंपराच आहे बरे का. दरवर्षी एकदा तरी असा मथळा येतोच छापून. बहुधा त्याचा परमनंट ब्लॉक करून ठेवलेला असावा. कदाचित बातमीच्या इंट्रोचाही ब्लॉक तयार असेल. पावसाळ्यातला कार्यक्रमासाठी हा इंट्रोचा ब्लॉक. तोच कार्यक्रम उन्हाळ्यात झाला, की हा इंट्रोचा ब्लॉक. चांगले आहे. यातून डोक्याची केवढी बचत होते!
आणि त्या वर्धापनदिन सोहळ्याबद्दल काहीच नाही वाटले?
व्वा! वाचून मजा वाटली की. जितेंद्र जोशी यांच्या कविता आणि कोट्या, नकलाकार श्रीनिवास लखपती यांच्या नकला, असा छानच नकली कार्यक्रम आयोजित केला होता सकाळकारांनी. ही नवी परंपरा सुरु केलेली दिसतेय सकाळने. लावण्या, नकला, ऑर्केस्ट्रा, त्याचे पांचट सूत्रसंचालन... अत्यंत उंची मनोरंजन! अखेर म्हणतात ना, उंचे लोग उंची पसंद!!...
ते जाऊ द्या हो. तुम्ही ती बातमी आणि कार्यक्रमाची चित्रझलक नीट पाहिलेली दिसत नाही...
का? काय झाले?
अहो, त्या बातमीने तिकडे मंत्रालयात मोठी खळबळ माजली आहे. सगळे सनदी अधिकारी तर चक्रावूनच गेलेत...
काय म्हणता काय?... अहो, पण मनिषाताई म्हैसकरांची छायाचित्रे छापून आली म्हणून काही एवढी खळबळ माजायला नको. लोकांचे पण कसे असते ना? तिकडे दिल्लीत एवढे रामायण झाले, त्याने नाही खळबळ माजली आणि...
दिल्लीत? काय झाले काय?
तुम्हांला माहित नाही? काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राचे गणेश रामदासी माहिताहेत ना? ते हो, माहिती उपसंचालक. तर मनिषाबाईंनी त्यांची बदली केली होती. तिकडं नाशिकला...
म्हणजे लोकसत्ताच्या संजय आवटेंची झाली होती तशीच?
हो तशीच. आता अशी चर्चा आहे, की ती बदली अत्यंत 'अभिनंदनी'य व 'थोरा'-मोठ्यांनी केलेली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून चावाच काढला म्हणा ना गणेशभाईंचा! आता गणेशभाई म्हणजे षटकार क्लबचे आधारस्तंभ. तो असा तसा कसा क्लिन बोल्ड होईल? त्यांनीसुद्धा मग फिल्डिंग लावली. जोरात सामना झाला तो. जणू लोकमान्य लोकशक्ती विरोधी महाराष्ट्र टाइम्स यांच्यातील ट्वेंटी-ट्वेंटीच. अखेर हा सामना रामदासींनीच जिंकला आणि त्यांची बदली रद्द झाली. मनिषाताईंनी केलेली बदली नव्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केली. म्हणजे अशी चर्चा आहे. खरं काय ते तपासून पाहिले पाहिजे...
हो पण, सकाळमधील बातमी याहून खळबळजनक आहे. मनिषा म्हैसकर यांच्याकडचे माहिती महासंचालकपद गेले म्हणतात... तुम्ही टुडेतली चित्रझलक नाही वाचलीत? तिथे फोटो कॅप्शनमध्ये, देवेंद्र भुजबळ हे राज्याचे माहिती महासंचालक असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. विशेष म्हणजे बातमीत मात्र त्यांचे पद उपसंचालक असे दिले आहे. म्हणजे नक्कीच काही तरी मोठा घोळ असणार!
खिखिखिखि. तुम्ही पण काय राव पराचा कावळा करताय! अहो तो मुद्राराक्षसाचा विनोद आहे...
नाही हो. तसे असणे शक्य नाही. कारण की सकाळच्या मुद्रितशोधन विभागाचे जे प्रमुख आहेत ना, त्यांच्याच हस्ते भुजबळसाहेबांचा सत्कार होतानाचा तो फोटो आहे. त्याची कॅप्शन कशी चुकेल? शिवाय सगळीकडे मनिषाताईंचा उल्लेख केवळ लोकराज्यच्या संपादिका असाच आलेला आहे.
नाही नाही. सकाळमध्ये काहीही होऊ शकते. तुम्ही उगाच अर्थाचा अनर्थ करू नका. पराचा कावळा करू नका. छोटीशी चूक आहे ती.
पण मग मनिषाताई म्हणाल्या त्यात तर काही चूक नाही ना?
काय म्हणाल्या त्या?
वाचत जा हो बातम्या नीट. उगाच संपादकांसारखे करताय! त्यांना बिचा-यांना वेळ नसतो पेपर वाचायला. पण तुम्हांला काय उद्योग असतो हो?
नाही, ते मनिषाताई काय म्हणाल्या ते सांगताय ना?
त्यांनी सकाळवर टीका केली की सकाळची प्रशंसा याबद्दल मतभेद आहेत. पण त्या म्हणाल्या, की सकाळ हे ट्रेनिंग सेंटर आहे. आणि येथूनच त्यांना त्यांच्या लोकराज्यसाठी प्रशिक्षित कर्मचारी मिळाले.
असे म्हणाल्या त्या?
छापून आलेय तसे सकाळमध्येच. वाचत जा हो तुम्ही...
मनिषाताई या ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. आणि सनदी अधिकारी म्हटले, की तो बोलतो एक आणि त्याचा अर्थ असतो दुसराच. कोणत्याही मंत्र्याला विचारा हे! तेव्हा नक्कीच मनिषाताईंच्या या विधानात दोन अर्थ दडलेले असणार.
यातला पहिला अर्थ कोणता?
सकाळ हे ट्रेनिंग सेंटर आहे, याचा अर्थ येथून बाहेर पडणारे पत्रकार हे सुप्रशिक्षित असतात. चांगले असतात.
आणि दुसरा अर्थ?
सकाळमधून पत्रकार नेहमीच बाहेर पडतात! टिकत नाहीत...
टिकत नाहीत असे कसे म्हणता तुम्ही? अनेक पत्रकार दशकानुदशके आहेतच की सकाळमध्ये.
तो सकाळचा नाईलाज आहे!
च्यामारी असा अर्थ आहे काय बाईंच्या बोलण्याचा. एकूणच वर्धापनदिनाच्या कार्यक्रमापेक्षा ही कार्यक्रमाची बातमी म्हणजे हशा-टाळ्यांचा झिम्मडझिम्मा आहे! व्वा व्वा!
सकाळच्या टुडे पुरवणीला आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
(Posted by चांगदेव पाटील, दि. २२ जून २००९)
जमल्यास हेही वाचा -
टुडेच्या कुशीत टुमारो आला त्या सोहळ्याचा वृत्तांत (बातमीदार)
हॅपी बर्थडेची गोष्ट (बेस्ट ऑफ भंकस)
मागील लेख
-
▼
2009
(49)
-
►
January
(13)
- ब्लॉगची फुलली बाग!
- पौषसहलीचे कवित्व
- स्वातंत्र्य, संपादक आणि हाय हल्ला!
- कळते-समजते वाचलात?
- आमची साहित्यिक जबाबदारी
- पुन्हा एकदा (शॅडो) सकाळ!
- पुरस्कार जिवाला लावी पिसे...
- एका बातमीचे भजे!
- आमची शोधपत्रकारिता आणि बापूचा आत्रंगी आजार
- नावात काय असते?
- निवेदन
- पत्रपोळ्यानिमित्ताने मागे-पुढे वळून पाहताना...
- काही संकल्पचित्रे
-
►
January
(13)
कळते समजते
मीडियाविषयक पहिला मराठी बातमीब्लॉग
कळते-समजते
मीडियातील घटना आणि घडामोडींच्या बातम्यांसाठी...
याशिवाय यात आहेत
मराठी ऑनलाइन वृत्तपत्रे
महत्त्वाच्या पत्रांतील एडिट-ऑपेडवरील लेख
मीडिया विषयक खास लेख
आणि
मराठी पत्रकारांचे ब्लॉग्ज
या सगळ्यांच्या लिंक्स.
कळते-समजते!
Live Traffic Feed

This work is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-Share Alike 3.0 Unported License.
A-Cidic
Communications, Mumbai
(ए-सिडिक कम्युनिकेशन्स,
मुंबई)
Mail to - blogeditor.acidic@gmail.com

